Friday, 8 July 2011

ययाति.

ययाति
      - वि. स.खांडेकर. 
(मेहता पब्लिशिंग हाऊस, किं. २०० रु.)

कै.विष्णू सखाराम तथा भाऊसाहेब खांडेकर यांच्या एकूण साहित्यकृतींच्या रत्नमाळेतील 'ययाति'चे स्थान मेरुमण्यासारखे आहे.
या कादंबरीचा पुराणाशी केवळ नावापुरता संबंध नाही. एका प्रसिद्ध पौराणिक उपख्यानाचे धागेदोरे घेऊन ते त्यांनी या कादंबरीत स्वतंत्र रीतीने गुंफले आहेत.
आपल्या प्रतिभेची जात,तिची शक्ती आणि तिच्या मर्यादा यांची योग्य जाणीव झालेल्या खांडेकरांनी आत्माविष्काराला योग्य अशीच कथा निवडली.ती ज्या माध्यमातून त्यांना प्रगट व्हावीशी वाटली, त्याच्यावर त्यांचे प्रभुत्व होतेच. पुराणकथांत जे भव्य-भीषण संघर्ष आढळतात, त्यांचे मंथन करण्याची अंगभूत शक्तीही त्यांच्या चिंतनात होती. जीवन जसे एका दृष्टीने क्षणभंगुर आहे, तसेच, ते दुसऱ्यादृष्टीने चिरंतन आहे;ते जितके भौतिक आहे, तितकेच आत्मिक आहे, या कठोर सत्याचे आकलनही त्यांना पूर्णत्वाने झालेले होते. त्यामुळेच एका पौराणिक कथेच्या आधाराने एक सर्वोत्तम ललितकृती कशी निर्माण करता येते, याचा आदर्श वस्तुपाठच 'ययाति'च्या रूपाने श्री. खांडेकरांनी वाचकांपुढे ठेवला आहे.
कामुक, लंपट, स्वप्नातही ज्याला संयम ठाऊक नाही, असा ययाति; अहंकारी,महत्त्वाकांक्षी, मनात दंश धरणारी आणि प्रेमभंगाने अंतरंगात द्विधा झालेली देवयानी; स्वतःच्या सुखाच्या पलीकडे सहज पाहणारी आणि ययातिवर शरीरसुखाच्या, वासानातृप्तीच्या पलीकडच्या प्रेमाचा वर्षाव करणारी शर्मिष्ठा आणि निरपेक्ष प्रेम हाच ज्याचा स्वभावधर्म होऊन बसला आहे, असा विचारी, संयमी व ध्येयवादी कच या चार प्रमुख पात्रांमधील परस्परप्रेमाची विविध स्वरूपे या कादंबरीत समर्थपणे चित्रित झालेली आहेत.
'ही कादंबरी ययातीची कामकथा आहे, देवयानीची संसारकथा आहे. शर्मिष्ठेची प्रेमकथा आहे आणि कचाची भक्तीगाथा आहे, हे लक्षात घेऊन वाचकांनी ती वाचावी,' अशी अपेक्षा स्वतः खांडेकरांनीच व्यक्त केली
आहे.      

Saturday, 2 July 2011

'गंगेमध्ये गगन वितळले.'

'गंगेमध्ये गगन वितळले.'
                   - अंबरीश मिश्र.
(राजहंस प्रकाशन, किं. - १४० रु.)
गांधी 
काळाच्या चरख्यावर माणुसकीची वस्त्र विणणारा 
विसाव्या शतकातला कबीर.
 
मुक्तीचं आकाश धरतीत पेरणारा अलौकिक महापुरुष.
 
स्वातंत्र्यलक्ष्मीच्या या कफल्लक उपासकाची जीवनकहाणी
म्हणजे उक्तट महाकाव्य. उज्ज्वल अन उदासही..
 
गांधींनी एका धाग्यात देश जोडला! मनं सांधली!
फाळणीचं दुर्दैव मात्र ते टाळू शकले नाहीत..
 
ते स्वातंत्र्यसंग्रामाचे सरसेनापती.
तरीही एकटेच भिरभिरत राहिले कैकदा.
 
धर्म ही त्यांच्या मते एक उन्नत प्रेरणा.
पण त्यांच्या समोर मात्र धर्माच्या नावावरच 
रक्त सांडलं - सांडत राहिलं.
 
विलक्षण प्रेम आणि आत्यंतिक द्वेष अशा कचाट्यात असतो गांधी.
 
पुन्हा एकदा पाह्यला हवं महात्म्याकडं 
 
महादेवभाई देसाई, जमनालाल बजाज, मनुबेन गांधी, हरिलाल गांधी... या आणि अशाच काही जिवलग सहकाऱ्यांच्या आठवणी, दैनंदिनी आणि पत्रव्यवहारातून एक वेगळाच नयानवेला गांधी रेखांकित होतो...
 
जणू गंगेत वितळत जाणारं आकाश.

Tuesday, 7 June 2011

कॉलनी

'कॉलनी'
      - सिद्धार्थ पारधे.
(मॅजेस्टिक प्रकाशन, किंमत- १७५ रु.)
दरवर्षी सहा डिसेंबर महापरिनिर्वाण दिनी आम्ही सर्व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना श्रद्धांजली वाहायला दादरच्या चैत्यभूमीवर जातो.मला आठवतं,तो आमचा एक सणाचा दिवस असायचा. सकाळी तीन-चार वाजता उठून आंघोळ करून, नवीन कपडे घालून आम्ही सकाळीच पाचच्या सुमारास बसने  दादर चौपाटी गाठायचो.  आम्ही एवढ्या सकाळी लवकर जाऊनही दर्शनाची रांग दादरच्या केटरिंग कॉलेजपर्यंत पोहोचलेली असायची. आम्ही तर   इथल्या इथंच राहायचो, तरी उशिरा पोहोचायचो. पण काही लोक बाहेर गावाहून दोन दिवस आधीच मुंबईत सहा डिसेंबरसाठी शिवाजी पार्कच्या मैदानात ताल ठोकून बसायचे. त्यांचे दोन दिवसांचे सर्व दिनक्रम शिवाजी पार्कच्या मैदाना  उघड्यावरच व्हायचे. देशाच्या कानाकोपऱ्यातून गोरगरीब जनता लाखोंच्या संख्येने बाबासाहेबांच्या पायावर नतमस्तक व्हायला रांग लावते. स्वतंत्र भारताच्या पताका यांच्या डोक्यावरून गेल्या; पण स्वातंत्र्योत्सवाचे फुटणे मात्र यांच्या पदरात कधीच पडले नाहीत. ज्यांच्या झोळीत पडले ते त्यांच्या वाट्याला आलेले आंबेडकर घेऊन बाजूला झाले. हे लोक या रांगेत नाहीत. या रांगेतील मंडळी असेल ते फाटकं गुंडाळून गेल्या पन्नासाहून अधिक वर्षं चैत्यभूमीच्या वाळूत त्यांच्या देवाचा शोध घ्यायला येतात. पण माझा शोध घ्यायचा असेल,तर 'वाचा, शिका, संघटीत व्हा'  हा मोलाचा संदेश बाबासाहेबांनी या जनतेला नुसता दिला असं नव्हे, तर भारताच्या घटनेतच त्याचा कायमचा मार्ग करून ठेवलाय. आम्हीसुद्धा आमचा भगवान शोधायला दरवर्षी सहा डिसेंबरला चौपाटीवर जातो. सहा डिसेंबर हा दिवस खरा म्हणजे आमच्या दु:ख्खाचा दिवस! त्या दिवशी आमचे बाबासाहेब आम्हाला सोडून गेले. पण आम्हाला कुठे काळात होतं! आम्ही लहान होतो. तो दिवस म्हणजे आम्ही आमचा सन म्हणून साजरा करायचो. त्या दिवसाची आम्ही आतुरतेने वात बघायचो. कारण त्याच दिवशी आमच्या घरी लवकर चटणी- भाकरी व्हायची. आई कामावरून सुट्टी घ्यायची आणि बाबापण रजा टाकायचे.
                                              - सिद्धार्थ पारधे.

Sunday, 1 May 2011

नटरंग.

'नटरंग'
      - आनंद यादव.
(मेहता पब्लिशिंग हाउस,किंमत-१४० रु.)


'नटरंग'
मराठीतील एक अव्वल दर्जाची,कलात्म आणि शोकात्म कादंबरी.'नटरंग' मध्ये आनंद यादवांच्या लेखकीय व्यक्तिमत्त्वाची बहुतेक सारी वैशिष्ट्ये प्रभावीपणे व्यक्त झाली आहेत.प्रसंगांना चित्रवत आकार देण्याची आणि संपूर्ण रसपूर्ण बनविण्याची,त्यांना मनोवैज्ञानिक स्पर्श देण्याची,प्रसंगातील कारुण्य आणि विनोद हेरण्याची लेखकाची क्षमता विलक्षण आहे.त्यामुळे कादंबरीचे वातावरण चैतन्यपूर्ण झाले आहे.
'नटरंग' ही एका भारतीय कलावंताची शोकांतिका.
तिला अनुभवाचे अनेक पदर आहेत.जीवनातील भयानक दारिद्र्य आणि कलात्मक उर्जा,कलावंताचे कुटुंब, आणि कलावंताचे कला-व्यक्तिमत्त्व,मातंग समाजाची रुढीग्रस्त जीवनशैली आणि तिच्या बाहेर जाऊन आत्मप्रेरणेने आणि कलानिर्मितीच्या आकांक्षेने जगू पाहणारा कलावंत,कलेचा उपयोग पोट भरू पाहण्यासाठी करू पाहणारे सहकारी आणि कलेच्या विशुद्धतेचा ध्यास घेऊ पाहणारा कलावंत,अशी संघर्षाची विविध आणि व्यामिश्र रूपे 'नटरंग' मध्ये एकजीव झालेली आहेत.
- डॉ.चंद्रकान्त बांदिवडेकर.

Tuesday, 22 March 2011

कानगोष्टी: माझा इंटरव्ह्यू..!!!

कानगोष्टी: माझा इंटरव्ह्यू..!!!: "आपलं कोणी कौतुक करतंय,प्रेमाने पाठ थोपटतंय ही इतकी सुंदर भावना आहे..प्रचंड उर्जा देणारी..नवीन अधिक चांगलं काम करण्यासाठी उर्मी देणारी...'मरा..."

Thursday, 24 February 2011

'मोगरा फुलला'

'मोगरा फुलला'
      -गो.नी.दांडेकर.
(मॅजेस्टिक प्रकाशन,किंमत-२००रु.)

ही कहाणी आहे विश्वात्मक झालेल्या देवमाणसांची!म्हणजे निवृत्तिनाथाची,ज्ञानदेवाची,सोपान-मुक्ताईची आणि अलौकिक अशा त्यांच्या माता-पितरांची!त्यांनी लौकिकात जे भोगले,ते केवळ शब्दातीत;आणि जे अलौकिक अनुभवले,ते तर 'शब्देंविण' संवादिण्यासारखे!
अशांची चरित्र-चित्रे रेखाटण्यास कलाकाराची कल्पनाशक्ती आणि शब्दसिद्धी 'अमृतातेंहि पैजा जिंकणारी असावी लागते.
'भावार्थदीपिकेच्या' सौम्य-शांत,प्रसन्न-मनोहर,जीवनोद्धारक प्रकाशात तीन तपांहून अधिक काळ न्हाऊन निघालेल्या गो.नी.दांडेकरांच्या कविमनाने अरूपाचे रूप 'दावण्याचा' ध्यास घेतला.
आजच्या कळाहीन जगात 'ज्ञानेश्वरी' जगू पाहणाऱ्या एका विलक्षण जीवाची भावनोत्कट कहाणी त्यांनी याआधीच आपल्या 'मृण्मयी' या कादंबरीत सांगितली आहे.पण 'वसुधैव कुटुंबकम' झालेल्या त्या मूळ कुटुंबाची कथा-गाथा गायल्याविना त्यांचे कविमन कृतार्थ होऊ शकत नव्हते.
आता 'मोगरा फुलला' आहे,फुले वेचिता कळियांसी बहर आला आहे;कल्पित पात्रांच्या मुखांतून अकल्पिताची कथा सांगण्याचे नवल वर्तले आहे.ह्या नवलगंधाने दांडेकर प्राणा-मनांतून फुलून आले आहेत,आणि मराठी कादंबरी-सृष्टीला एक नवलभेट देऊन कृतकृत्य झाले आहेत.

Thursday, 20 January 2011

'युगंधर'


'युगंधर'
      -शिवाजी सावंत.
(कॉन्टीनेन्टल प्रकाशन,किंमत-४००रु.)



श्रीकृष्ण! गेली पाच हजार वर्ष भारतीय स्त्री-पुरुषांच्या व्यक्त-अव्यक्त मनांचा तळठाव व्यापून दशांगुळे शेष उरणारी एक सशक्त विभूतीरेखा-एक युगपुरुष! श्रीकृष्ण चरित्राचे अधिकृत संदर्भ सापडतात ते मुख्यतः श्रीमदभागवत,महाभारत,हरिवंश व काही पुराणांत.या प्रत्येकात गेल्या हजारो वर्षांत सापेक्ष विचारांची,मनगढंत पुटंच पुटं चढली आहेत.त्याचं तांबूस-नीलवर्णी,सावळं,गर्भातच दुर्लभ रंगसूत्रांचे संस्कार घेतलेलं,श्रीयुक्त म्हणजे सुंदर रुपडं घनदाट झालंय.अतर्क्य चमत्कारांचे स्रोतच स्रोत नकळत्या भाबडेपणी टाकल्यामुळे.

            आज तर श्रीकृष्ण क्रमशः वास्तवापासून शेकडो योजनं दूर दूर जाऊन बसलाय.आजच्या 'भारतीय' म्हणून असलेल्या जीवनप्रणालीचा श्रीकृष्ण हा पहिला उद्गार आहे!.............
................................श्रीकृष्णाच्या मूळ जीवनसंदर्भाची मोडतोड न करता त्याचं 'युगंधरी' रूप बघता येईल का?त्याच्या स्वच्छ नीलवर्णी जीवन सरोवराचं दर्शन घेता येईल का?गीतेत त्याने विविध जीवनयोग नुसतेच सांगितले का?की त्याच्या दिव्य,गतिमान सुदर्शन चक्रासारखे प्रत्यक्ष जगूनही दाखवले?त्याच्या जीवन सरोवरातील हजारो वर्षे साठलेलं शेवाळ तर्कशुद्ध सावधपणे अलगद दूर सारलं तर त्याचं 'युगंधरी' दर्शन शक्य आहे.
             'मृत्युंजय'च्या यशःशील रचनाकाराची प्रदीर्घ चिंतन,सावध संदर्भशोधन,डोळस पर्यटन व जाणत्यांशी भाषण यांतून साकारलेली साहित्यकृती-युगंधर!!