Tuesday 7 June 2011

कॉलनी

'कॉलनी'
      - सिद्धार्थ पारधे.
(मॅजेस्टिक प्रकाशन, किंमत- १७५ रु.)
दरवर्षी सहा डिसेंबर महापरिनिर्वाण दिनी आम्ही सर्व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना श्रद्धांजली वाहायला दादरच्या चैत्यभूमीवर जातो.मला आठवतं,तो आमचा एक सणाचा दिवस असायचा. सकाळी तीन-चार वाजता उठून आंघोळ करून, नवीन कपडे घालून आम्ही सकाळीच पाचच्या सुमारास बसने  दादर चौपाटी गाठायचो.  आम्ही एवढ्या सकाळी लवकर जाऊनही दर्शनाची रांग दादरच्या केटरिंग कॉलेजपर्यंत पोहोचलेली असायची. आम्ही तर   इथल्या इथंच राहायचो, तरी उशिरा पोहोचायचो. पण काही लोक बाहेर गावाहून दोन दिवस आधीच मुंबईत सहा डिसेंबरसाठी शिवाजी पार्कच्या मैदानात ताल ठोकून बसायचे. त्यांचे दोन दिवसांचे सर्व दिनक्रम शिवाजी पार्कच्या मैदाना  उघड्यावरच व्हायचे. देशाच्या कानाकोपऱ्यातून गोरगरीब जनता लाखोंच्या संख्येने बाबासाहेबांच्या पायावर नतमस्तक व्हायला रांग लावते. स्वतंत्र भारताच्या पताका यांच्या डोक्यावरून गेल्या; पण स्वातंत्र्योत्सवाचे फुटणे मात्र यांच्या पदरात कधीच पडले नाहीत. ज्यांच्या झोळीत पडले ते त्यांच्या वाट्याला आलेले आंबेडकर घेऊन बाजूला झाले. हे लोक या रांगेत नाहीत. या रांगेतील मंडळी असेल ते फाटकं गुंडाळून गेल्या पन्नासाहून अधिक वर्षं चैत्यभूमीच्या वाळूत त्यांच्या देवाचा शोध घ्यायला येतात. पण माझा शोध घ्यायचा असेल,तर 'वाचा, शिका, संघटीत व्हा'  हा मोलाचा संदेश बाबासाहेबांनी या जनतेला नुसता दिला असं नव्हे, तर भारताच्या घटनेतच त्याचा कायमचा मार्ग करून ठेवलाय. आम्हीसुद्धा आमचा भगवान शोधायला दरवर्षी सहा डिसेंबरला चौपाटीवर जातो. सहा डिसेंबर हा दिवस खरा म्हणजे आमच्या दु:ख्खाचा दिवस! त्या दिवशी आमचे बाबासाहेब आम्हाला सोडून गेले. पण आम्हाला कुठे काळात होतं! आम्ही लहान होतो. तो दिवस म्हणजे आम्ही आमचा सन म्हणून साजरा करायचो. त्या दिवसाची आम्ही आतुरतेने वात बघायचो. कारण त्याच दिवशी आमच्या घरी लवकर चटणी- भाकरी व्हायची. आई कामावरून सुट्टी घ्यायची आणि बाबापण रजा टाकायचे.
                                              - सिद्धार्थ पारधे.