Thursday, 16 February, 2012

कालिंदी

कालिंदी
       - जगन्नाथ कुंटे.
(प्राजक्त प्रकाशन, किंमत- २०० रु.)

... पुन्हा वाऱ्याने धुमाकूळ घातला, आणि पाऊस अस्सा कोसळला! नभ फाटलं असावं, अशी स्थिती. पृथ्वीची खैर नाही. पावसाचा का बरं एवढा भूमीवर राग? तिला बिचारीला फार झोडपून काढली. उसको कही की न रखी! ही कुठली प्रेयसीला भेटण्याची अनोखी पद्धत? अरे शृंगार कसा नाजूक हवा. शरीरातला कण अन कण फुलवत तिला गोंजारलं पाहिजे. हा कसला विचित्र धसमुसळेपणा? ही प्रेमाची आततायी तऱ्हा बघून पृथ्वी कंप पावू लागली.
 चार दिवसांनी ढगांआडचा सूर्य बाहेर आला. त्यानं भूमीला जरा उब दिली. तिच्यात नवचैतन्य आणलं. तिला धीर दिला. चहूबाजूंनी कृष्णमेघांची दाटी होती. भूमीला त्यांचं आकर्षण होतं. त्यांच्या धारांनी तिला चिंब भिजायचं होतं. त्यांच्या थेंबाथेंबाशी खेळत झिम्मा खेळायचा होता. पण हे काय असलं धसमुसळेपणानं धुडगूस घालणं!
 हळूहळू पाहिलं झोकून देऊन अंगाशी येणं थांबलं. भूमीशी गोडीगुलाबीनं पाऊस समजूतदारपणे खेळू लागला. भूमीच्या अंगावर बाळसं आलं. शृंगाराचा विलोभनीय रंग पसरू लागला. भूमी गर्भार झाली. गर्भाचं तेज झळकू लागलं. भूमी लाजून लाजून हसू लागली. स्वतःतच रमू लागली. हिरव्या पोपटी रंगाची पालवी लाजत लाजत डोकावू लागली. लाल पोपटी रंगाचे कोंभ कुतूहलानं हळूच आजूबाजूला पहात हसू लागले. त्या झुरायला लावणाऱ्या पावसात सृष्टी तृप्त झाली. कालिंदीला पावसात भिजायची खूप हौस. तिनं मनसोक्त भिजून घेतलं. ओले ओले केस पुसताना तिला नकळत स्वामीची आठवण झाल. किती वर्ष झाली? आपण स्वामीला विसरलो नाही, याचाही आनंद कालीन्डीला भिजवून गेला! शरीर म्हातारं झालं, मन अजून कोवळ्या उन्हासारखं होतं.