Sunday, 31 July, 2011

समुद्र

समुद्र.
     - मिलिंद बोकील.
(मौज प्रकाशन, किं - ८० रु.) 
 
 रात्री जेवणानंतर नंदिनीला सांगून तो पुन्हा समुद्रावर गेला. आदल्या रात्रीसारखीच किनाऱ्यावरची हवा शांत, तटस्थ होती. आकाशात चंद्र उगवलेला. काही तुरळक चांदण्या. डाव्या बाजूला बंदरातले पिवळे दिवे. समुद्र आणि आकाश एकाच काळोखात बुडालेले, पण किनाऱ्यावर चंद्राच्या प्रकाशात दिसत होते. वाळूत बसण्याऐवजी उजव्या बाजूला समुद्रातच खडक होते, तिकडे जाऊन तो बसला.
 ओहोटी संपली होती पण भारती पूर्ण वेगाने सुरु व्हायची होती. समुद्राचे पाणी चुळबुळत येऊन खडकांवर आदळत होते. काळसर, रुपेरी फेस.आतल्या लाटांचा अस्पष्ट आवाज. अंधारात फक्त खडकांचा आकार कळत होता. तो शांतपणे बसून राहिला. अंधाराला नजर सरावली तसा त्याला पाण्याचा गहिरा रंग दिसू लागला. नंतर काही वेळाने क्षितीजरेषेवरून दिसणारा आकाशाचा फिकट काळोख.
 मग हळूहळू शांतता अधिक घनदाट होत गेली. गार वारे येत राहिले. त्या शांततेत समुद्राकडे एकटक बघताना त्याच्या लक्षात येत गेले की पाणी हेलकावत असले, लाटा चुळबुळत असल्या तरी तो नुसता पृष्ठभाग आहे. समुद्राचा गाभा त्याहून आतमध्ये आहे. खोल, गूढ, अपरंपार पाण्यात. जिथे सूर्य पोचू शकत नाही, वादळेही ज्याला हलवू शकत नाहीत. खरा समुद्र तो आहे. अथांग. आणि तो नुसता पाण्याचा साठा नाही. सगळ्या गूढ रहस्यमय अस्तित्त्वाचे मूळ आहे ते.
 त्याला वाटले, इतकी वर्षं समुद्र पाहिला पण आता पहिल्यांदाच हे लक्षात आलं आपल्या. लाटा म्हणजे समुद्र नाही. लाटा म्हणजे पृष्ठभाग आहे. वाऱ्यानं हलणारा. पायापाशी येऊन फुटून जाणारा. खरा समुद्र निराळा आहे. तो दिसत नाही, फक्त जाणून घेता येतो. आणि तो असा आतमध्ये शांत बसला आहे. पृष्ठभागावर काय चाललेलं आहे याची त्याला फिकीर नाही. सूर्य तळपतो, पाण्याची वाफ होते, ढग येतात, पाऊस पडतो, वादळे उठतात, आकाशातून तारे तुटतात, गलबतं लहरतात; या सगळ्या वरवरच्या गोष्टी आहेत. समुद्र आतमध्ये जसा आहे तसाच आहे; स्थिर, अविचल आणि स्वतःच्या अस्तित्त्वात मग्न.
 त्याला वाटले, हे एक रहस्य आहे. एरवी कोणाला समजणार नाही. समुद्रतळाशी जाणाऱ्या देवमाशांना काळात असेल कदाचित. पण आपल्याला समजतेय आता आणि ती फार चांगली गोष्ट आहे. हे कळण्यासाठीच कदाचित इथे आलो असणार. उद्या जाऊ इथून. पण हे सोबत घेऊन जाऊ. मनात भरून घेऊन जाऊ; या खाऱ्या ओलाव्यासकट.   

1 comment:

  1. he pustak khup chan ahe. recently vachalay. milind bokilanchi sagalich vachayala havit ata.

    ReplyDelete