Thursday 8 August, 2013

दाद

प्रतिभावान लेखक, वक्ता, संगीतज्ञ, काव्य-शास्त्र- विनोदाच्या मैफली रंगतदार करणारा धीमान, संगीत- नाट्य- दिग्दर्शक, एकपात्री प्रयोगाची अभिनव, बहुरूपी परंपरा निर्माण करणारा अभिनेता अशी पु. ल. देशपांडे यांची अनेक रूपे रसिकांना परिचित आहेत. ही सर्व रूपे रसिकांना अभिमुख अशी. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे आणखी एक अंतर्मुख रूप आहे ते एका संवेदनशील रसिक वाचकाचे. जीवनाविषयीच्या दुर्दम्य ओढीतून ते निर्माण झालेले आहे. मानवी जीवनातले नानाविध अनुभव व्यक्त करणाऱ्या पुस्तकांकडे ते म्हणूनच आकर्षित होतात. ते अनुभव समजून घेऊन त्यांतून मिळणारा आनंद वाटून टाकणे ही त्यांची सहज उर्मी आहे. त्यांच्या वाचनाला कसलेही वावडे नाही. भाषेचे नाही की वांग्मयप्रकाराचे नाही. जुन्याचे नाही की नव्याचे नाही. चांगले पुस्तक- मग ते ग्रामीण असो, नागरी असो, दलित असो, पांढरपेशा जगाचे असो, समाजातल्या कोणत्याही थरातील लेखकाने लिहिलेले असो- त्यातले वांग्मयीन सौंदर्य व भाषेचे गुण जाणवताच ते आवर्जून वाचतात. त्यांचे वाचन तेवढयावरच थांबत नाही. मग ते कधी लेखकाला उस्फूर्तपणे पत्र लिहितात, कधी पुस्तकाचा आस्वाद घेणारा लेख भरभरून, मोकळ्या मनाने लिहितात, कधी आवडलेल्या पुस्तकाला मर्मग्राही प्रस्तावना लिहितात. समीक्षेच्या या किंवा त्या तात्त्विक भूमिकातून केलेल्या रूक्ष चिकित्सेत ते शिरत नाहीत. साहित्यकृतीच्या आस्वादाला लगटून त्यांची चिकित्सा मूल्यमापन येतच असते
    इतके तऱ्हातऱ्हांचे अविरतपणे वाचणारा, वाचले त्याचा आनंद उत्साहाने सर्वांना वाटून वाढवणारा, नव्या नव्या आश्वासक लेखकांचा हुरूप द्विगुणीत करणारा ज्येष्ठ लेखक विरळा
  पु. लं. नी वेळोवेळी व्यक्त केलेल्या अशा निवडक प्रतिक्रियांचा 'दाद' हा संग्रह. याआधीच्या ' चार शब्द' या पुस्तकात त्यांनी लिहिलेल्या वेचक, आस्वादक प्रस्तावना समाविष्ट झालेल्या आहेत. या दोन संग्रहांत त्यांच्या अभिजात, संगीत- साहित्य- कलांच्या सौंदर्यात भिजलेल्या मनमोकळा प्रतिसाद देणाऱ्या रसिकतेची साक्ष पटते.
    पु. लं. ची पुस्तकांविषयीची प्रीती त्यांनी लिहिलेल्या, '… म्हणुनी ग्रंथांची आवडी' या लेखात सुंदरपणे व्यक्त झाली आहे. तो लेख या संग्रहाला प्रास्ताविक म्हणून दिला आहे.  

Thursday 16 February, 2012

कालिंदी

कालिंदी
       - जगन्नाथ कुंटे.
(प्राजक्त प्रकाशन, किंमत- २०० रु.)

... पुन्हा वाऱ्याने धुमाकूळ घातला, आणि पाऊस अस्सा कोसळला! नभ फाटलं असावं, अशी स्थिती. पृथ्वीची खैर नाही. पावसाचा का बरं एवढा भूमीवर राग? तिला बिचारीला फार झोडपून काढली. उसको कही की न रखी! ही कुठली प्रेयसीला भेटण्याची अनोखी पद्धत? अरे शृंगार कसा नाजूक हवा. शरीरातला कण अन कण फुलवत तिला गोंजारलं पाहिजे. हा कसला विचित्र धसमुसळेपणा? ही प्रेमाची आततायी तऱ्हा बघून पृथ्वी कंप पावू लागली.
 चार दिवसांनी ढगांआडचा सूर्य बाहेर आला. त्यानं भूमीला जरा उब दिली. तिच्यात नवचैतन्य आणलं. तिला धीर दिला. चहूबाजूंनी कृष्णमेघांची दाटी होती. भूमीला त्यांचं आकर्षण होतं. त्यांच्या धारांनी तिला चिंब भिजायचं होतं. त्यांच्या थेंबाथेंबाशी खेळत झिम्मा खेळायचा होता. पण हे काय असलं धसमुसळेपणानं धुडगूस घालणं!
 हळूहळू पाहिलं झोकून देऊन अंगाशी येणं थांबलं. भूमीशी गोडीगुलाबीनं पाऊस समजूतदारपणे खेळू लागला. भूमीच्या अंगावर बाळसं आलं. शृंगाराचा विलोभनीय रंग पसरू लागला. भूमी गर्भार झाली. गर्भाचं तेज झळकू लागलं. भूमी लाजून लाजून हसू लागली. स्वतःतच रमू लागली. हिरव्या पोपटी रंगाची पालवी लाजत लाजत डोकावू लागली. लाल पोपटी रंगाचे कोंभ कुतूहलानं हळूच आजूबाजूला पहात हसू लागले. त्या झुरायला लावणाऱ्या पावसात सृष्टी तृप्त झाली. कालिंदीला पावसात भिजायची खूप हौस. तिनं मनसोक्त भिजून घेतलं. ओले ओले केस पुसताना तिला नकळत स्वामीची आठवण झाल. किती वर्ष झाली? आपण स्वामीला विसरलो नाही, याचाही आनंद कालीन्डीला भिजवून गेला! शरीर म्हातारं झालं, मन अजून कोवळ्या उन्हासारखं होतं.

Thursday 5 January, 2012

कोसला


कोसला 
         - भालचंद्र नेमाडे
(पॉप्युलर प्रकाशन, किंमत- २२५ रु.)

अजिंठा 
हे प्रचंड कठीण दगडी अर्धवर्तुळ. समोर कायम धोधो कोसळणारा धबधबा. दिवसभर त्याचा आवाज मनात घुमतो आहे. आणि मी लेण्यांमागून लेणी पाहतो आहे. 
 एकात बुद्धाची भली मोठ्ठी  उंच मूर्ती. मांडी घालून बसलेली. बुद्ध थेट लेण्याच्या दारातून पाहतो आहे. काय पाहतो आहे? फार फार विकल झालेला आहे. त्याच्या पापण्या अर्ध्या मिटलेल्या वाटतात. त्या अर्ध्या उघड्या मंगोल पापण्यांकडे मी टक लावून पाहतो. उजव्या हाताची पाची बोटं वर करून डाव्या हाताची बोटं तो मोजतो आहे. हाताची बोटं दहा. त्या बोटांवर ह्यानं सगळ्या उत्पत्तीचा आणि संहाराचा पसारा मोजला. मी पुन्हा वर पहातो. एवढी मोठ्ठी मूर्ती  सगळी दृष्टीच्या एका कोनात पहाता येत नाही. वारंवार डोळे फिरवावे लागतात. दगडी तोंडावर संथपणे लहरणारे भाव. अतिशय विकल. विकता मोठ्ठाल्या पंखांनी झेपावत येते. आणि मला उचलून वर घेऊन जाते. खूप वर. आणि मला सोडून देते. कुठे तरी आदळणार मी. पुढे ही मूर्ती. त्याच्या तोंडावरचं हे दुःख्ख मोजता येणार नाही. नाहीच मोजता येणार. हे स्थूल आणि सूक्ष्म दुःख्ख चिमटीत येत नाही. घिरट्या घालणारं दुःख्ख.  दुःख्ख प्यायलाही दुःख्खाची ओंजळ लागते. माझ्या कवडीएवढ्या दुःख्खाने हे वाळवंटाएवढं दुःख्ख मोजवत नाही. माझी वर्तुळांकित दुःख्ख. त्या एवढ्या फटीतून ह्या चेहऱ्याकडे काय पाहता येणार? त्या दगडी चेहऱ्यावरच्या दुःख्खात मी कोसळतो. माझ्या दुःख्खाचा परीघ तोलता येत नाही. मी म्हणालो, माझ्यावर दया कर. अँड पीटी फ्रॉम यू मोअर डियर दॅन दॅट फ्रॉम अनदर. पण हा बुद्ध आपली कीव करणार नाही. याची करूणा आपल्यासाठी नाही. हा टमबॉम्ब सारखा पोटात आग गोठवून बसला आहे.


Wednesday 14 December, 2011

रमलखुणा

रमलखुणा.
         - जी. ए. कुलकर्णी
(पॉप्युलर प्रकाशन, किंमत- १५० रु.)


जीएंच्या नावाचा फक्त दबदबा ऐकू यायचा. त्या वेळी मी माझ्या चित्रांच्या प्रपंचात गुंतलो होतो. त्यांच्या कथा माझ्याकडे चित्रांसाठी यायच्या. मला त्या आवडायच्या. त्यांच्या कथेमध्ये मला वेगवेगळी चित्रे, वेगवेगळे विषय दिसायचे. कधी त्यांचे कथेतले वर्णन वाचता वाचता मी खोल पोहोचायचो. त्या वेळी वाटायचे: अरे, हे तर पेंटिंगच आहे!
त्यांच्या कथांमध्ये अनेक, वेगळ्याच ठेवणीतल्या चेहऱ्यांची माणसे यायची. वाचत असताना परत वाटायचे: जीए 'पोर्ट्रेट' किती छान रंगवतात! कथा वाचताना कुठेतरी ते अशा जागी मला नेऊन सोडत की, मी माझ्याच चित्रांच्या विश्वात असे.
त्यांची कथाचित्रे करताना कथा माझ्या डोक्यावर कधीच नसे; ती झाडांच्या फांद्या- फांद्यांतून, पानांशी खेळत राहणाऱ्या झुळुकीसारखी आसपास असे. ती आसपास खेळत असतानाच माझी चित्रे पूर्ण होत: ती संपादकांसाठी.
ही चित्रे झाली तरी माझी दुसरी चित्रे त्यांतूनच वेगाने सुरु होत.
कारण मला वाटे, जीएंची गोष्ट काही चारसहा छापील कागदांत पकडण्याइतकी छोटी नाही. तिचा कॅनव्हास खूप मोठा आहे.
                                                                                                                               - सुभाष अवचट. ('जीए: एक पोर्ट्रेट' मधून.) 

Sunday 31 July, 2011

समुद्र

समुद्र.
     - मिलिंद बोकील.
(मौज प्रकाशन, किं - ८० रु.) 
 
 रात्री जेवणानंतर नंदिनीला सांगून तो पुन्हा समुद्रावर गेला. आदल्या रात्रीसारखीच किनाऱ्यावरची हवा शांत, तटस्थ होती. आकाशात चंद्र उगवलेला. काही तुरळक चांदण्या. डाव्या बाजूला बंदरातले पिवळे दिवे. समुद्र आणि आकाश एकाच काळोखात बुडालेले, पण किनाऱ्यावर चंद्राच्या प्रकाशात दिसत होते. वाळूत बसण्याऐवजी उजव्या बाजूला समुद्रातच खडक होते, तिकडे जाऊन तो बसला.
 ओहोटी संपली होती पण भारती पूर्ण वेगाने सुरु व्हायची होती. समुद्राचे पाणी चुळबुळत येऊन खडकांवर आदळत होते. काळसर, रुपेरी फेस.आतल्या लाटांचा अस्पष्ट आवाज. अंधारात फक्त खडकांचा आकार कळत होता. तो शांतपणे बसून राहिला. अंधाराला नजर सरावली तसा त्याला पाण्याचा गहिरा रंग दिसू लागला. नंतर काही वेळाने क्षितीजरेषेवरून दिसणारा आकाशाचा फिकट काळोख.
 मग हळूहळू शांतता अधिक घनदाट होत गेली. गार वारे येत राहिले. त्या शांततेत समुद्राकडे एकटक बघताना त्याच्या लक्षात येत गेले की पाणी हेलकावत असले, लाटा चुळबुळत असल्या तरी तो नुसता पृष्ठभाग आहे. समुद्राचा गाभा त्याहून आतमध्ये आहे. खोल, गूढ, अपरंपार पाण्यात. जिथे सूर्य पोचू शकत नाही, वादळेही ज्याला हलवू शकत नाहीत. खरा समुद्र तो आहे. अथांग. आणि तो नुसता पाण्याचा साठा नाही. सगळ्या गूढ रहस्यमय अस्तित्त्वाचे मूळ आहे ते.
 त्याला वाटले, इतकी वर्षं समुद्र पाहिला पण आता पहिल्यांदाच हे लक्षात आलं आपल्या. लाटा म्हणजे समुद्र नाही. लाटा म्हणजे पृष्ठभाग आहे. वाऱ्यानं हलणारा. पायापाशी येऊन फुटून जाणारा. खरा समुद्र निराळा आहे. तो दिसत नाही, फक्त जाणून घेता येतो. आणि तो असा आतमध्ये शांत बसला आहे. पृष्ठभागावर काय चाललेलं आहे याची त्याला फिकीर नाही. सूर्य तळपतो, पाण्याची वाफ होते, ढग येतात, पाऊस पडतो, वादळे उठतात, आकाशातून तारे तुटतात, गलबतं लहरतात; या सगळ्या वरवरच्या गोष्टी आहेत. समुद्र आतमध्ये जसा आहे तसाच आहे; स्थिर, अविचल आणि स्वतःच्या अस्तित्त्वात मग्न.
 त्याला वाटले, हे एक रहस्य आहे. एरवी कोणाला समजणार नाही. समुद्रतळाशी जाणाऱ्या देवमाशांना काळात असेल कदाचित. पण आपल्याला समजतेय आता आणि ती फार चांगली गोष्ट आहे. हे कळण्यासाठीच कदाचित इथे आलो असणार. उद्या जाऊ इथून. पण हे सोबत घेऊन जाऊ. मनात भरून घेऊन जाऊ; या खाऱ्या ओलाव्यासकट.   

Tuesday 12 July, 2011

Relationship

Relationship
         - Nayantara Sahgal
            E. N. Mangat Rai
(HarperCollins Publishers, Price- Rs.395)


 When Relationship was first published in1994, it was received with varying degrees of shock and appreciation. For, in this exchange of letters dating from an extremely turbulent period of their livs, Nayantara Sahgal and E. N. Mangat Rai, two very public figures who had remained at the same time intensely private, broke their self- imposed silence for the first time.

 This newly revised edition includes all of the correspondence carried in the previous one, with a short but signifcant addition: Chandigarh Diary; an honest and often emotionally wrenching account of Nayantara's life with her husband and children before the break-up.

 Both the diary and the letters highlight one woman' endeavour to remain true to herself , her writing , her ideals , and relationships, both outside and within marriage. They speak of a growing and passionate involvement of the authors' joy and pain at discovering an intellctual companionship while recognizing the difficulties of keeping such a relationship alive. They reflect too, on the dilemmas and compulsions that bind men and women into particular relationships, and the exigencies of public life and its implications for the private sphere.

A mirror of the times when a kind of idealism amd commitment still seemed possible, Relatonship gives the reader an insight into the life and thoughts of one of India's most successful writers, and one of India's most distinguished civil servants of his generation.

Monday 11 July, 2011

कानगोष्टी: आनंदाचा कंद, विठ्ठल सावळा!

कानगोष्टी: आनंदाचा कंद, विठ्ठल सावळा!: "आषाढी एकादशी आली...आत्ता चंद्रभागेच्या वाळवंटात एकच आनंद भरून राहिला असेल..हरिनामाचा उद्गार आसमंत व्यापून राहिला असेल.. हजारो- लाखो साधे सु..."