कोसला
- भालचंद्र नेमाडे
(पॉप्युलर प्रकाशन, किंमत- २२५ रु.)
अजिंठा
हे प्रचंड कठीण दगडी अर्धवर्तुळ. समोर कायम
धोधो कोसळणारा धबधबा. दिवसभर त्याचा आवाज मनात घुमतो आहे. आणि मी लेण्यांमागून
लेणी पाहतो आहे.
एकात बुद्धाची भली मोठ्ठी उंच मूर्ती. मांडी घालून बसलेली. बुद्ध थेट
लेण्याच्या दारातून पाहतो आहे. काय पाहतो आहे? फार फार विकल
झालेला आहे. त्याच्या पापण्या अर्ध्या मिटलेल्या वाटतात. त्या अर्ध्या उघड्या
मंगोल पापण्यांकडे मी टक लावून पाहतो. उजव्या हाताची पाची बोटं वर करून डाव्या
हाताची बोटं तो मोजतो आहे. हाताची बोटं दहा. त्या बोटांवर ह्यानं सगळ्या
उत्पत्तीचा आणि संहाराचा पसारा मोजला. मी पुन्हा वर पहातो. एवढी मोठ्ठी मूर्ती
सगळी दृष्टीच्या एका कोनात पहाता येत नाही. वारंवार डोळे फिरवावे लागतात.
दगडी तोंडावर संथपणे लहरणारे भाव. अतिशय विकल. विकलता मोठ्ठाल्या पंखांनी झेपावत
येते. आणि मला उचलून वर घेऊन जाते. खूप वर. आणि मला सोडून देते. कुठे तरी आदळणार
मी. पुढे ही मूर्ती. त्याच्या तोंडावरचं हे दुःख्ख मोजता येणार नाही. नाहीच मोजता
येणार. हे स्थूल आणि सूक्ष्म दुःख्ख चिमटीत येत
नाही. घिरट्या घालणारं दुःख्ख. दुःख्ख प्यायलाही दुःख्खाची ओंजळ लागते. माझ्या कवडीएवढ्या दुःख्खाने हे वाळवंटाएवढं दुःख्ख मोजवत नाही. माझी वर्तुळांकित दुःख्ख. त्या एवढ्या फटीतून ह्या चेहऱ्याकडे
काय पाहता येणार? त्या दगडी चेहऱ्यावरच्या दुःख्खात मी कोसळतो. माझ्या दुःख्खाचा परीघ तोलता येत नाही. मी म्हणालो, माझ्यावर दया कर. अँड पीटी फ्रॉम यू मोअर डियर
दॅन दॅट फ्रॉम अनदर. पण हा बुद्ध आपली कीव करणार नाही. याची करूणा आपल्यासाठी नाही.
हा ऍटमबॉम्ब सारखा पोटात
आग गोठवून बसला आहे.
ekdam mast
ReplyDelete