प्रतिभावान लेखक, वक्ता, संगीतज्ञ, काव्य-शास्त्र- विनोदाच्या मैफली रंगतदार करणारा धीमान, संगीत- नाट्य- दिग्दर्शक, एकपात्री प्रयोगाची अभिनव, बहुरूपी परंपरा निर्माण करणारा अभिनेता अशी पु. ल. देशपांडे यांची अनेक रूपे रसिकांना परिचित आहेत. ही सर्व रूपे रसिकांना अभिमुख अशी. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे आणखी एक अंतर्मुख रूप आहे ते एका संवेदनशील रसिक वाचकाचे. जीवनाविषयीच्या दुर्दम्य ओढीतून ते निर्माण झालेले आहे. मानवी जीवनातले नानाविध अनुभव व्यक्त करणाऱ्या पुस्तकांकडे ते म्हणूनच आकर्षित होतात. ते अनुभव समजून घेऊन त्यांतून मिळणारा आनंद वाटून टाकणे ही त्यांची सहज उर्मी आहे. त्यांच्या वाचनाला कसलेही वावडे नाही. भाषेचे नाही की वांग्मयप्रकाराचे नाही. जुन्याचे नाही की नव्याचे नाही. चांगले पुस्तक- मग ते ग्रामीण असो, नागरी असो, दलित असो, पांढरपेशा जगाचे असो, समाजातल्या कोणत्याही थरातील लेखकाने लिहिलेले असो- त्यातले वांग्मयीन सौंदर्य व भाषेचे गुण जाणवताच ते आवर्जून वाचतात. त्यांचे वाचन तेवढयावरच थांबत नाही. मग ते कधी लेखकाला उस्फूर्तपणे पत्र लिहितात, कधी पुस्तकाचा आस्वाद घेणारा लेख भरभरून, मोकळ्या मनाने लिहितात, कधी आवडलेल्या पुस्तकाला मर्मग्राही प्रस्तावना लिहितात. समीक्षेच्या या किंवा त्या तात्त्विक भूमिकातून केलेल्या रूक्ष चिकित्सेत ते शिरत नाहीत. साहित्यकृतीच्या आस्वादाला लगटून त्यांची चिकित्सा व मूल्यमापन येतच असते.
इतके तऱ्हातऱ्हांचे अविरतपणे वाचणारा, वाचले त्याचा आनंद उत्साहाने सर्वांना वाटून वाढवणारा, नव्या नव्या आश्वासक लेखकांचा हुरूप द्विगुणीत करणारा ज्येष्ठ लेखक विरळा.
पु. लं. नी वेळोवेळी व्यक्त केलेल्या अशा निवडक प्रतिक्रियांचा
'दाद' हा संग्रह. याआधीच्या ' चार शब्द' या पुस्तकात त्यांनी लिहिलेल्या वेचक, आस्वादक प्रस्तावना समाविष्ट झालेल्या आहेत. या दोन संग्रहांत त्यांच्या अभिजात, संगीत- साहित्य- कलांच्या सौंदर्यात भिजलेल्या व मनमोकळा प्रतिसाद देणाऱ्या रसिकतेची साक्ष पटते.
पु. लं. ची पुस्तकांविषयीची प्रीती त्यांनी लिहिलेल्या, '… म्हणुनी ग्रंथांची आवडी' या लेखात सुंदरपणे व्यक्त झाली आहे. तो लेख या संग्रहाला प्रास्ताविक म्हणून दिला आहे.