Wednesday, 29 December 2010

'भारत आणि जग'

'भारत आणि जग'
       -गोविंद तळवलकर.
(मौज प्रकाशन,किंमत-४००रु.)

   'परराष्ट्र धोरण' हा तसा किचकट विषय.पण इतिहासाची आवड असणाऱ्या आणि त्याचे धागेदोरे आत्ताच्या काळात शोधायचा प्रयत्न करणाऱ्या कोणालाही हा विषय नेहमीच खुणावतो. हा विषय क्लिष्ट न करता अत्यंत सोप्या भाषेत समजवण्याचं आव्हान लीलया पेललं आहे ज्येष्ठ पत्रकार गोविंद तळवलकर यांनी,त्यांच्या  'भारत आणि जग' या ग्रंथातून..अभ्यासासाठी म्हणून हे पुस्तक वाचायला घेतलं, आणि हळू हळू त्यात गुंतून गेले..तो 'अभ्यास' आहे,हे विसरून..
   स्वतंत्र भारताच्या परराष्ट्र नीतीचा पाया देशाच्या मुक्तीच्या प्रयत्नांना आरंभ झाला तेव्हाच घातला गेला. त्यानंतर  दादाभाई नौरोजींपासून अमर्त्य सेनांपर्यंत प्रचलित झालेल्या अनेक विचारधारा यात ते सांगतात. अगदी भारताच्या स्वातंत्र्यापासून(१९४७) ते मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यापर्यंत प्रचंड विस्तृत कालखंडाचा आढावा या ग्रंथात आहे. पं.नेहरूंची तत्त्वं, अलिप्ततावादाचं महत्त्व,पंचशील मागचा स्वप्नाळूपणा,चीनच्या आक्रमणाने त्याला बसलेला धक्का, शीतयुद्धाची आपल्याला बसलेली झळ,पाकिस्तान धार्जिणी,दुटप्पी अमेरिका,इंदिरा पर्व,आणीबाणी,आणि या सगळ्यात तावून-सुलाखून निघालेली संसदीय लोकशाही.. या सगळ्याची मुळापासून,सर्व बाजूंनी माहिती 'भारत आणि जग' वाचताना झाली. राजकीय,सामाजिक दृष्ट्या महत्त्वाच्या कित्येक संकल्पना उमगल्या.
    आधुनिक भारताचा(India After Idependence) संपूर्ण इतिहास तारखांमध्ये न अडकवता 'भारत आणि जग' रंजकपणे आपल्यासमोर उलगडतं. जागतिक राजकारणाची प्यादी नेमकी हलतात कशी,का,कुणामुळे..यावर विचार करायला मला 'भारत आणि जग'ने भाग पाडलं..आणि आजच्या काळाशी इतिहासाचा relevance कसा असतो,हेही जाणवून दिलं.

1 comment:

  1. Kal mi eka pustaka baddal aaikale. Naav aahe `How to run the world' Bagh milale tar.

    ReplyDelete