Wednesday, 14 December 2011

रमलखुणा

रमलखुणा.
         - जी. ए. कुलकर्णी
(पॉप्युलर प्रकाशन, किंमत- १५० रु.)


जीएंच्या नावाचा फक्त दबदबा ऐकू यायचा. त्या वेळी मी माझ्या चित्रांच्या प्रपंचात गुंतलो होतो. त्यांच्या कथा माझ्याकडे चित्रांसाठी यायच्या. मला त्या आवडायच्या. त्यांच्या कथेमध्ये मला वेगवेगळी चित्रे, वेगवेगळे विषय दिसायचे. कधी त्यांचे कथेतले वर्णन वाचता वाचता मी खोल पोहोचायचो. त्या वेळी वाटायचे: अरे, हे तर पेंटिंगच आहे!
त्यांच्या कथांमध्ये अनेक, वेगळ्याच ठेवणीतल्या चेहऱ्यांची माणसे यायची. वाचत असताना परत वाटायचे: जीए 'पोर्ट्रेट' किती छान रंगवतात! कथा वाचताना कुठेतरी ते अशा जागी मला नेऊन सोडत की, मी माझ्याच चित्रांच्या विश्वात असे.
त्यांची कथाचित्रे करताना कथा माझ्या डोक्यावर कधीच नसे; ती झाडांच्या फांद्या- फांद्यांतून, पानांशी खेळत राहणाऱ्या झुळुकीसारखी आसपास असे. ती आसपास खेळत असतानाच माझी चित्रे पूर्ण होत: ती संपादकांसाठी.
ही चित्रे झाली तरी माझी दुसरी चित्रे त्यांतूनच वेगाने सुरु होत.
कारण मला वाटे, जीएंची गोष्ट काही चारसहा छापील कागदांत पकडण्याइतकी छोटी नाही. तिचा कॅनव्हास खूप मोठा आहे.
                                                                                                                               - सुभाष अवचट. ('जीए: एक पोर्ट्रेट' मधून.)